टीडीएसची ए, बी, सी, डी [ लेख-1 ] : सीए. गणेश पांचाळ

HomeBlogआयकर / AAYKARटीडीएसची ए, बी, सी, डी [ लेख-1...

टीडीएसची ए, बी, सी, डी [ लेख-1 ]

सीए. गणेश पांचाळ,पुणे


टीडीएस हा भारतीय सरकारद्वारे आकारला जाणारा एक प्रकारचा प्रत्यक्ष कर (टॅक्स) आहे. टीडीएस अर्थात Tax Deducted at Source, याचा मराठी अर्थ उत्पन्न स्त्रोतांवर कर कपात असा होतो. म्हणजेच उत्पन्नाच्या स्त्रोतापासून किंवा मुळातून वजावट केलेला कर. टीडीएस, ही भारतातील आयकर कायदा, 1961 च्या अंतर्गत असलेली एक तरतूद आहे.
जेव्हा एखाद्या करदात्याला उत्पन्न मिळते आणि त्या उत्पन्नाच्या स्त्रोतापासूनच जेव्हा त्या करदात्यांचा आयकर कापून, सरकारकडे (आयकर विभागाकडे) जमा केला जातो, तेव्हा वजावट केलेल्या अशा आयकराला टीडीएस संबोधले जाते.
जेव्हा निर्दिष्ट व्यक्ती (Payer) टीडीएसच्या कार्यक्षेत्रात येणारे पेमेंट करतो, तेव्हा त्यांना उत्पन्नाच्या प्राप्तकर्त्यास (Payee or Recipient) वास्तविक पेमेंट करण्यापूर्वी, पेमेंटची काही टक्के रक्कम टीडीएस म्हणून कापून घेणे आवश्यक असते. त्यानंतर वजा केलेली ही रक्कम ठराविक मुदतीत सरकारकडे जमा केली जाते. म्हणजे जे उत्पन्न मिळते ते टीडीएस वजा करूनच प्राप्तकर्त्याच्या हाती पडते.

टीडीएस हा वेगळा कर नसून तो आयकरच

सर्वच प्रकारच्या देयकावर किंवा पेमेंटवर टीडीएस लागू होतो का ? तर नाही . जी देयके किंवा पेमेंट टीडीएसच्या कार्यक्षेत्रात येतात त्यांच्यावरच टीडीएसच्या तरतुदी लागू होतात.
पुढील प्रकारची देयके ही टीडीएस कार्यक्षेत्रात येतात : जसे वेतन, व्याज, कमिशन, भाडे, व्यावसायिक शुल्क, सल्लागाराची फी, कंत्राटदाराला विविध कामासाठी देय असलेली रक्कम, लाभांश, अनिवासी भारतीय आणि परदेशी लोकांची देयके इत्यादी विविध प्रकारच्या देयकांवर टीडीएस लागू होतो.
हा वजावट केलेला कर म्हणजेच टीडीएस, प्राप्तकर्त्याच्यावतीने आयकर विभागाला जमा केला जातो. त्यामुळे ह्या टीडीएसचे क्रेडिट त्या उत्पन्नाच्या प्राप्तकर्त्यास त्याचा आयकर भरताना मिळते.
प्राप्तकर्त्याने त्याचे वार्षिक आयकर विवरणपत्र (Income Tax Return म्हणजेच ITR) दाखल करताना त्याला आलेल्या एकूण आयकर देय रकमेमधून (Total Income Tax Liability) त्या वर्षासाठी कपात झालेल्या टीडीएस ची रक्कम वजा करून उर्वरित आयकर भरणे आवश्यक असते.
टीडीएसचे दर हे पेमेंट किंवा देयकाचे स्वरूप आणि आयकर कायद्याच्या लागू तरतुदींवर अवलंबून असतात. प्राप्तकर्ता कोणत्याही कपातीसाठी किंवा सवलतींसाठी पात्र असल्यास, ठरलेल्या दरापेक्षा कमी दराने त्याच्या टीडीएसची कपात होऊ शकते. टीडीएसच्या तरतुदी/यंत्रणा कशाप्रकारे कार्य करतात हे उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ.

उदाहरण – एबीसी प्रा.लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीला 1 लाख रुपये व्यावसायिक फी म्हणून श्रीमती मीनल बोटके यांना देणे आहे. समजा टीडीएस कपातीचा दर 10% आहे असे गृहीत धरू. आता संबंधित एबीसी प्रा.लि. कंपनी (म्हणजेच Payer/Deductor) 1 लाख रुपयामधून 10% दराने म्हणजेच 10,000 रुपये टीडीएसची कपात करेल आणि उर्वरित रक्कम म्हणजेच 90 हजार रुपये श्रीमती मीनल बोटके यांना अदा करेल. कपात केलेली 10,000 रुपये कंपनी आयकर विभागाला जमा करेल. तसेच श्रीमती मीनल बोटके यांना फॉर्म 16 ए च्या नमुन्यात टीडीएस सर्टिफिकेट जारी करेल. श्रीमती मीनल बोटके जेव्हा वार्षिक आयकर विवरण पत्र दाखल करतील तेव्हा त्यांना 10,000 रुपयाचे टॅक्स क्रेडिट मिळेल म्हणजेच त्यांना जो एकूण आयकर भरणा असेल त्यामधून हे 10,000 रुपये वजा होतील.

टीडीएसचा उद्देश आगाऊ कर संकलन करणे आणि सरकारला महसूलाचा स्थिर प्रवाह सुनिश्‍चित करणे हा आहे. करचुकवेगिरी रोखण्यास तसेच करसंकलन सुव्यवस्थित करण्यासाठी टीडीएस एक प्रभावी यंत्रणा म्हणून मदत करते.
आयकर कायदा 1961 च्या अंतर्गत कलम 192 ते कलम 196डीच्या अन्वये टीडीएसच्या सर्व तरतुदी नमूद करण्यात आल्या आहेत. इथून पुढे प्रत्येक लेखामध्ये आपण टीडीएसच्या एक किंवा दोन कलमांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. खालील किमान 7 विविध मुद्यांच्या आधारे आपण प्रत्येक प्रकारच्या टीडीएसची माहिती घेणार आहोत.
  • टीडीएस कपातीसाठी जबाबदार व्यक्ती / कपात करणारी व्यक्ती अर्थात टीडीएस कोणी (व्यक्ती, संस्था, फर्म) कपात करायचा – Deductor
  • उत्पन्नाची प्राप्तकर्ता व्यक्ती – Deductee

  • पेमेंट किंवा देयकाचे स्वरूप ज्याच्यावर टीडीएस लागू आहे (Nature of Payment)

  • टीडीएस कपातीसाठी पेमेंटची/देयकाची किमान मर्यादा – (Threshold Limit)
  • टीडीएस कपात करण्याची वेळ – When to Deduct टीडीएस

  • टीडीएस कपातीचा दर -टीडीएस रेट

  • इतर मुद्दे, लागू असतील तर – Other Special Points-

 

 

टीडीएस कपात करणार्‍या व्यक्तीच्या जबाबदार्‍या (Responsibilities of Deductor)

1) निर्धारित वेळेत, कपात केलेल्या टीडीएस ची रक्कम, आयकर विभागाला जमा करणे :
ज्या महिन्यांमध्ये टीडीएस कपात केली आहे तो महिना संपल्यानंतर येणार्‍या महिन्यातील 7 तारखेच्या आत (अपवाद मार्च महिन्याचा टीडीएस 30 एप्रिलपर्यंत जमा करायचा आहे) टीडीएस जमा करणे आवश्यक आहे. जर हा टीडीएस उशिरा जमा केला तर 201(1ए) कलमांतर्गत व्याज भरावे लागते.
2) टीडीएस विवरणपत्र (टीडीएस Return) दाखल करणे :

अ) टीडीएस आयकर विभागाला भरल्यानंतर टीडीएसचे त्रैमासिक विवरणपत्र (टीडीएस Return) आयकर विभागाला दाखल करणे आवश्यक आहे. कपात केलेल्या टीडीएसची परिपूर्ण माहिती दिलेली असते जसे की उत्पन्नाच्या प्राप्तकर्त्याचे नाव, त्याचा पॅन क्रमांक, बिल किंवा पेमेंटची रक्कम, बिलाचे/ पेमेंटचे स्वरूप इत्यादी. हे त्रैमासिक विवरणपत्र दाखल केल्यानंतरच प्राप्तकर्त्यास टीडीएसचे क्रेडिट घेता येते.

ब) पेमेंट किंवा देयकाच्या स्वरूपानुसार, टीडीएसचे विवरणपत्र हे तीन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दाखल केले जाते.

देयकाचे स्वरूप  फॉर्म क्रमांक
वेतन किंवा पगारात कपात केलेल्या टी डी  एस चे विवरण पत्र  २४ क्यू
वेतन सोडून इतर सर्व देयके (अनुक्रमांक १ आणि ३ या प्रकारातील देयक सोडून ) २६ क्यू
भारताबाहेर पाठवलेल्या पेमेंट किंवा देयकावरील टी डी एस चे विवरण पत्र याठिकाणी प्राप्तकर्ता अनिवासी भारतीय, परदेशी कंपन्या किंवा परदेशस्त व्यक्ती असू शकतो  २७ क्यू

क) कपात केलेला टीडीएस आयकर विभागाकडे जमा करण्यासाठी आणि त्याची टीडीएसचे विवरणपत्र दाखल करण्यासाठी प्रत्येक कपात करणार्‍या व्यक्तीकडे टॅन नंबर म्हणजेच Tax Deduction Account Number असणे आवश्यक आहे .

ड) टीडीएसचे त्रैमासिक विवरणपत्र वेळेत दाखल करणे खूप आवश्यक आहे कारण ते वेळेत दाखल नाही केले तर रुपये 200 प्रति दिवस एवढा विलंब शुल्क आयकर कायदा अंतर्गत आकारला जातो.

3) प्राप्तकर्त्या व्यक्तीला टीडीएस प्रमाणपत्र जारी करणे
टीडीएसची कपात केल्यानंतर उत्पन्नाच्या प्राप्तकर्त्या व्यक्तीला, कपात करणारी व्यक्ती, टीडीएसची कपात केल्याचा पुरावा म्हणून टीडीएस प्रमाणपत्र जारी करते. उत्पन्नाच्या स्वरूपानुसार हे प्रमाणपत्र खालील चार प्रकारात दिले जाते.
टीडीएस कपात करणार्‍या व्यक्तीने, आयकर कायद्यांतर्गत लागू असलेल्या टीडीएसच्या वेगवेगळ्या तरतुदीचे काटेकोर आणि तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. असे न केल्यास आयकर कायद्यांतर्गत व्याज, दंड, विलंब शुल्क, आणि काही केसेसमध्ये तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद आहे.

सारांश

सरकार जास्तीत जास्त लोकांना आयकराच्या कक्षेत आणण्यासाठी टीडीएसचा एक साधन म्हणून उपयोग करत आहे. यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये टीडीसी विभागांमध्ये नव-नवीन कलमांचा समावेश केला जात आहे आणि उत्पन्नाचे नवीननवीन स्त्रोत याकक्षेमध्ये आणले जात आहेत, तसेच विद्यमान कलमांमध्येही सुधारणा केली जात आहे जेणेकरून करसंकलनामध्ये वृद्धी होईल. टीडीएस कपात करणार्‍या व्यक्तीने कायद्याचे काटेकोर आणि तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
Tags: No tags
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
Enter Your Mobile No.

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments