HomeBlogआयकर / AAYKARस्थावर मालमत्ता विक्रीकर, टीडी...
स्थावर मालमत्ता विक्रीकर, टीडीएस आणि फॉर्म 26QB
श्री. सिद्धेश रेवाळे, खेड, रत्नागिरी (कर व्यवसायी)
आयकर कायदा येऊन ६२ वर्षे झाली आणि त्यामध्ये काळानुसार विविध बदल झाले; तसेच त्यामध्ये नवीन काही गोष्टी आल्या, त्याप्रमाणे आपण त्याचे पालन करत आहोत आणि आयकर वेळोवेळी भरत आहोत. कायद्याला अनुसरून आणि विविध प्रकारच्या नियमांचे पालन करत कर भरत आहोत. त्यातील एक कलम म्हणजे 194IA आणि त्यासोबत भरावा लागणारा 26QB फॉर्म भरावा लागतो. हे आज आपल्याला समजणे आणि सर्व व्यक्तींना त्याबद्दल माहीत असणे गरजेचे आहे. आज आपण आपली मालमत्ता विकत आणि खरेदी करत आहोत आणि त्यावर प्रामाणिकपणे भांडवली लाभ कर (Capital Gain Tax) देखील भरत आहोत, परंतु त्याबाबत टीडीएस करणे गरजेचे आहे. कारण ते नाही केले तर त्याबाबत असलेले दंड आणि व्याजदेखील आपणास भरावे लागू शकते त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते; या संदर्भातील माहिती अमृतमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण करणाऱ्या ‘व्यापारी मित्र’ सोबत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे.
परिचय
26QB हा फॉर्म खरेदीद्वारे मालमत्तेच्या विक्रीसाठी स्त्रोत अर्थात टीडीएस, रिटर्न वर कपात केलेला कर दाखल करण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म आहे. २०१३ च्या वित्त विधेयकानुसार, स्थावर मालमत्तेच्या विक्रीवर टीडीएस लागू आहे, ज्यामध्ये मालमत्तेची विक्री ५० लाखपेक्षा जास्त किंवा त्यांपेक्षा जास्त आहे. याबाबतीत आयकर कायद्यानुसार १ जून २०१३ पासून कलम 194IA अनुसार यापुढे सर्व व्यवहारांसाठी खरेदीदारांकडून @१% कर कापावा.
फॉर्म 26QB म्हणजे काय ?
फॉर्म 26QB शी संबंधित आवश्यकता
- हा फॉर्म भविष्यात समस्या येऊ नये म्हणून अचूकपणे भरणे आवश्यक आहे.
- फॉर्ममध्ये खरेदी करणारा आणि विक्री करणारा याच्या संबंधित सर्व माहिती असणे आवश्यक आहे
- खरेदीच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत फॉर्म सादर करणे गरजेचे आहे.
- रक्कम ५० लाखाच्या आत असेल तर टीडीएस कपात करणे आवश्यक नाही.
- कृषी जमीन विकली जात असेल तर 26QB भरावा लागणार नाही.
मालमत्तेच्या खरेदीदाराने लक्षात ठेवण्याचे मुद्दे
- विक्रेत्याचा कायमस्वरूपी खाते पॅन क्रमांक घ्यावा आणि पॅनकार्डने त्याची पडताळणी करावी.
- विक्री व्यवहारासंबंधी माहिती देण्यासाठी विक्रेत्याचा तसेच खरेदीदाराचा पॅन अनिवार्यपणे ऑनलाइन फॉर्ममध्ये सादर करणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन फॉर्ममध्ये पॅन किंवा इतर तपशील उद्धृत करताना कोणतीही चूक करू नका कारण त्रुटी सुधारण्यासाठी कोणतीही ऑनलाइन यंत्रणा नाही , सुधारणा करण्याच्या उद्देशाने तुम्हाला आयकर विभागाशी संपर्क साधावा लागू शकतो पण आज ऑनलाइन अन्वये या गोष्टी सहज साध्य झाल्या आहेत.
मालमत्तेच्या विक्रेत्याने लक्षात ठेवायचे मुद्दे
- आयकर विभागाला टीडीएस संबंधित माहिती देण्यासाठी खरेदीदाराला तुमचा पॅन द्या.
- तुमच्या फॉर्म 26AS वार्षिक कर विवरणामध्ये खरेदीदाराने कपात केलेल्या करांची ठेव सत्यप्रत (True Copy) करा.
फॉर्म 26QB शी संबंधित दंडात्मक शुल्क
- फॉर्म 26QB उशिरा फायलिंग केला तर देय तारखेपासून तर भरण्याच्या वास्तविक तारखेपर्यंत प्रति महिना १.५% व्याजदराने भरावा लागतो.
- टीडीएस रिटर्न फॉर्म भरण्यास विलंब केल्यास कर कपात न केलेल्या कमाल रकमेपर्यंत २०० रुपये प्रति दिवसाचा दंड लागतो.
- टीडीएस कपात नाही केले तर विक्रीच्या तारखेपासून कपातीच्या तारखेपर्यंत १% प्रति महिना व्याज भरावे लागते.
- फॉर्म 26QB दाखल केला नाही तर आयकर कायद्यानुसार कलम 271H अंतर्गत ₹ १०००० चा दंड भरावा लागू शकतो.
- देयक फॉर्म 26QB मध्ये विलंब झाल्यास देय तारखेपासून देय असलेल्या कर रकमेवर प्रति महिना १% व्याज ज्यानंतर ते पेमेंटच्या वास्तविक तारखेपर्यंत कपात केले गेले असावे.
26QB चे पेमेंट कसे करावे
- सर्व प्रथम www.incometax.gov.in या वेबसाईट वर जावे.
- त्यानंतर ई-फाईलमध्ये जाऊन ई-पे कर याला क्लीक करून New Payment ला क्लीक करावे.
- त्यानंतर 26QB (TDS on Sale of Property) वर जाऊन माहिती भरावी.
- सर्व माहिती भरल्यानंतर कर भरावा, त्याकरिता विविध प्रकारचे पेमेंट माध्यम करण्याकरिता दिले आहेत.
उदा. नेटबँकिंग, आरटीजीएस, असे अनेक पर्याय दिले आहेत आणि त्याकरिता नमूद बँका आहेत.
निष्कर्ष:
फॉर्म 26QB हा एक महत्त्वाचा फॉर्म आहे जो कोणतीही मालमत्ता खरेदी करताना भरणे आणि करणे आवश्यक आहे. या बाबींची पूर्तता केल्यास भविष्यात कोणतीही गुंतागुंत टाळणे सोपे जाते. त्यामुळे खरेदीदारांनी खात्री करावी की सुरळीत रिअल इस्टेट व्यवहारासाठी फॉर्म 26QB भरून आणि तो वेळेवर सादर करणे जरूरीचे आहे.