आयकर कायद्यासंबंधी सल्ला

HomeBlogआयकर / AAYKARआयकर कायद्यासंबंधी सल्ला

आयकर कायद्यासंबंधी सल्ला


अज्ञान व्यक्तीचे आर्थिक व्यवहार करताना त्याचे पालक किंवा अभिभावक यांचा पर्मनंट अकौंट नंबर (पॅन) देता येईल

प्रश्‍न 52 : माझ्या अज्ञान मुलाच्या नावाने एक जमीन आहे जी विकायची आहे. त्याला अन्य कोणतेही उत्पन्न मिळत नाही. त्याच्याकडे पॅन नाही. अशा वेळेस माझा पॅन देऊन व्यवहार पूर्ण करता येईल का?
उत्तर : आयकर नियम 114बी अनुसार नियमात नमूद केलेले व्यवहार करताना अशा व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांवर व्यक्तीचा पॅन उद्धृत करणे (लिहिणे) बंधनकारक आहे. नियमात दिलेल्या तक्त्यातील अनुक्रमांक 17 अनुसार रु.10 लाखापेक्षा जास्त रकमेची अचल मालमत्ता विक्री किंवा खरेदी करताना पॅन लिहावा लागेल. नियम 114बी च्या पहिल्या परंतुकेनुसार (प्रोव्हिजो) या नियमात उल्लेख केलेले व्यवहार करणारी व्यक्ती अज्ञान असल्यास आणि अशा व्यक्तीला आयकर पात्र कोणतेही उत्पन्न नसल्यास, अशी व्यक्ती नियमात उल्लेखित व्यवहार करताना त्याचे वडील किंवा आई किंवा अभिभावक (गार्डिअन) यांचा पॅन उद्धृत करू शकते.

दोन भावांच्या संयुक्त नावाने असलेले घर विकल्यास दोघांना भांडवली नफा होईल

प्रश्‍न 53 : माझ्या वडिलांच्या मृत्यूपश्‍चात त्यांच्या मालकीचे घर मी व माझ्या भावाच्या नावाने झाले. हे घर विकण्याचा विचार आहे. घर विकून आलेला सर्व नफा मोठ्या भावाला दाखवता येईल का? अन्यथा माझ्या हिश्श्याची रक्कम मी त्याला कशी देऊ शकेन?
उत्तर : घर दोन्ही भावांच्या संयुक्त मालकीचे आहे. घर विकून आपणा दोन्ही भावांना भांडवली नफा होईल. घर किती मुदतीसाठी आपल्या व वडिलांच्या मालकीचे होते त्यानुसार दीर्घ किंवा अल्प मुदतीच्या भांडवली नफ्याची गणना होईल. आपण घराचे संयुक्त मालक असताना आपला भांडवली नफा भावाच्या आयकर पत्रकात दाखवता येणार नाही. दोघांनीही आयकर पत्रकात भांडवली नफा दाखवून त्यावर आपल्याला कर भरावा लागेल. आपण आपली रक्कम त्याला कर्ज रुपाने देऊ शकता किंवा आपली रक्कम बक्षीस (गिफ्ट) स्वरुपातही भावाला देऊ शकता. यासंबंधीचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. बक्षिसावर आपणास अथवा आपल्या भावाला आयकर भरावा लागणार नाही.

पुतण्याला काकूकडून बक्षीस म्हणून मिळालेले घर करमाफ आहे

प्रश्‍न 54 : माझ्या काकूने मला एक घर (फ्लॅट) बक्षीसपत्र करून भेट म्हणून दिले आहे. घराची किंमत रु. 70 लाख आहे. घराची रितसर नोंदणी (रजिस्ट्रेशन) केले आहे व स्टँपड्युटी भरली आहे. अशावेळी घराची रक्कम माझे उत्पन्न धरले जाईल का?
उत्तर : आयकर कलम 56(2)(x)(b)(a) अनुसार कोणत्याही व्यक्तीला 1.4.2017 रोजी किंवा त्यानंतर कोणतीही अचल मालमत्ता विनामोबदला मिळाली असेल व त्या मिळकतीची सरकारी किंमत (स्टँपड्युटी व्हॅल्युएशन) रु. 50,000 पेक्षा जास्त असेल तर ती संपूर्ण सरकारी किंमत उत्पन्न म्हणून घेणार्‍याच्या उत्पन्नात समाविष्ट केली जाईल. परंतु अशी अचल मालमत्ता विनामोबदला नातेवाईकांकडून मिळालेली असेल तर ही तरतूद लागू होणार नाही. म्हणजेच असे बक्षीस करपात्र धरले जाणार नाही. नातेवाईकांमध्ये व्यक्तीच्या आई किंवा वडिलांचे भाऊ किंवा बहीण आणि त्यांचे पती अथवा पत्नी यांचा समावेश होतो. त्यामुळे काकूकडून पुतण्याला बक्षीस (गिफ्ट) म्हणून घर मिळाल्यास ते पुतण्याच्या हातात करपात्र धरले जाणार नाही.

भांडवली मालमत्ता खरेदी करण्यासाठी रु. 10,000 पेक्षा जास्त रक्कम रोखीने अदा केल्यास अशी रक्कम मालमत्तेची खरी किंमत धरली जाणार नाही. त्यावर घसारा वजा मिळणार नाही

प्रश्‍न 55 : मी नवीन मोटार कार रु. 8 लाखाला खरेदी केली आहे. मोटार कार खरेदीसाठी रु. 50,000 आगाऊ रक्कम रोखीने अदा केली होती यामुळे घसारा वजा घेण्यात काही अडचण येईल का?
उत्तर : आयकर कलम 43(1) च्या दुसर्‍या प्रोव्हिजोनुसार करदात्याने कोणतीही मालमत्ता किंवा तिचा भाग खरेदी करण्यासाठी एका व्यक्तीला एका दिवसात एकदा किंवा एकत्रितपणे एकूण रक्कम रु. 10,000 पेक्षा जास्त बँकेवर काढलेल्या अकौंट पेयी चेकने किंवा अकौंट पेयी बँक ड्राफ्ट किंवा बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिमचा वापर करून किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक विहित पद्धतीने न देता अन्य मार्गाने (अर्थात रोखीने) दिल्यास तो खर्च विकत घेण्यात येणार्‍या मालमत्तेची किंमत ठरवताना विचारात घेतला जाणार नाही. भांडवली मालमत्तेची ती किंमत धरली जाणार नाही म्हणजेच अशा रकमेवर घसार्‍याची वजावटही मिळणार नाही. त्यामुळे आपल्या केसमध्ये रु. 50,000 जे रोखीने अदा केले आहेत ते मोटार कारची खरेदी किंमतीत धरले जाणार नाही व त्यावर घसाराही वजा मिळणार नाही.

संपूर्ण वर्षभर नोकरी केली नसेल तरी प्रमाणित वजावट रु. 50,000 पर्यंत मिळेल

प्रश्‍न 56 : आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मी एप्रिल 22 ते सप्टेंबर 22 अशी सहा महिने नोकरी केली. लग्न झाल्यानंतर पुढे नोकरी केली नाही. माझा पगार रु. 50,000 महिना होता. मला रु. 50,000 प्रमाणित वजावट मिळेल का?
उत्तर : कलम 16() अनुसार पगारातून मिळणार्‍या उत्पन्नाची गणना करताना रु. 50,000 किंवा मिळालेला पगार यापैकी कमी असलेली रक्कम प्रमाणित वजावट (स्टँडर्ड डिडक्शन) म्हणून मिळेल. आपले पगारापासूनचे उत्पन्न रु. 3,00,000 (50,000*6 महिने) एवढे आहे. त्यातून आपल्याला रु. 50,000 एवढी प्रमाणित वजावट मिळेल. सहा महिने नोकरी केली नाही, म्हणून प्रमाणित वजावट कमी होणार नाही.

मालाच्या विक्रीवाढीसाठी (सेल्स प्रमोशन) बॉलपेन, पेन ड्राईव्ह इत्यादी वस्तूंचे वाटप केल्यास त्याची खर्च म्हणून वजावट मिळेल

प्रश्‍न 57 : आमचा उत्पादनाचा व्यवसाय आहे. मालाच्या विक्री वाढीसाठी आम्ही दुकानदारांना आमच्या मालासोबत बॉल पेन, पेन ड्राईव्ह इत्यादी वस्तू भेट म्हणून वाटप करतो. त्यावर आमच्या कंपनीचे नांव छापलेले असते. त्यामुळे आमची जाहिरात होते. या खर्चाची आम्हाला धंद्याचा खर्च म्हणून वजावट मिळेल का?
उत्तर : आपण आपला धंदा वाढावा म्हणून आपला माल विकणार्‍या दुकानदारांना सेल्स प्रमोशन म्हणून बॉलपेन, पेन ड्राईव्ह इत्यादी वस्तूंचे वाटप करता. या वस्तूंवर आपले नांव लिहिलेले आहे व त्यामुळे आपल्या व्यवसायाची जाहिरात होते. आपल्याला सेल्स प्रमोशनचा खर्च वजावट मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये. ऐशिका फार्मा (प्रा.) लि. वि. आयटीओ (2019) 177 आयटीडी 238 या केसमध्ये दिल्ली ट्रायब्यूनलने निर्णय दिला आहे की कंपनीचा लोगो छापून डॉक्टर आणि हॉस्पिटलला बॉलपेन्स आणि मेडिकल गिफ्ट इत्यादी दिल्यास त्याची खर्च म्हणून वजावट मिळेल. करदात्याच्या धंद्याशी संबंधित व्यक्तींना करदात्याच्या प्रॉडक्टची माहिती मिळावी हा त्यामागील हेतू आहे. त्यामुळे या खर्चाची वजावट आपल्याला मिळेल.

घर फर्निचरसह भाड्याने दिल्यास फर्निचरचे भाडे हे इतर स्रोतांपासूनचे उत्पन्न धरले जाईल

प्रश्‍न 57 : मी एक घर भाड्याने दिले असून त्याचे मासिक भाडे रु. 60,000 एवढे आहे. त्याशिवाय घरातील फर्निचरच्या भाड्यापोटी रु. 20,000 भाडे घेतो. फर्निचरचे भाडेसुद्धा घरापासूनचे उत्पन्न धरले जाईल का?
उत्तर : घर फर्निचरसह भाड्याने दिले असेल तर एकूण वार्षिक मूल्यातून फर्निचरच्या भाड्याची रक्कम कमी करायला हवी म्हणजेच फर्निचरचे भाडे त्यामध्ये मिळवता कामा नये. फर्निचरचे मिळणारे भाडे हे “इतर स्रोतांपासूनचे उत्पन्न’’ या शीर्षकाखाली दाखविले पाहिजे. त्यामुळे आपल्या केसमध्ये रु. 7,20,000 (60,00 12) वार्षिक मूल्याची गणना करण्यासाठी धरले जातील व त्यानुसार घरापासूनचे उत्पन्न काढले जाईल. फर्निचरचे भाडे रु. 2,40,000 (20,000*12) हे इतर स्रोतापासूनचे उत्पन्न म्हणून करपात्र धरले जाईल.

संबंधित पोस्ट :

Tags: No tags
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
Enter Your Mobile No.

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments