HomeBlogआरोग्य / Aarogyaझोपेची आराधना गोळ्यांऐवजी आहार...
झोपेची आराधना गोळ्यांऐवजी आहारातून
डॉ. अविनाश भोंडवे, पुणे
निद्रानाश हा आत्ताच्या जीवनशैलीचा आजार होऊ पाहतोय. त्यासाठी गोळ्या सुरू करण्याऐवजी योग्य आहाराचा उपयोग केल्यास फायद्याचे ठरते.
झोप न येण्याचा, उशिरा येण्याचा किंवा झोपेतून जाग येण्याचे त्रास आजमितीला सर्रास दिसून येतात. शाळकरी विद्यार्थी, कॉलेजियन्स, नोकरी-धंदा किंवा व्यवसायात गुरफटलेले मध्यमवयीन, निवृत्त आजोबा या सर्वांना झोप न येण्याचा अनुभव आयुष्यात कधी तरी हमखास येतोच. एखाद्या दिवशी न मिळालेली झोप दुसर्या दिवशी आपोआप भरून निघणार असेल, तर काळजी नसते; पण झोप न येण्याचा त्रास, वरचेवर आणि सातत्यानं होत असेल, तर डॉक्टरांना सांगून किंवा न सांगताही झोपेच्या गोळ्या सुरू केल्या जातात.
झोप न येण्याचा त्रास किंवा निद्रानाश ही आता जगभरातली नेहमीची गोष्ट झाली आहे. त्यातल्या आकडेवारीमध्ये काही रोचक मुद्दे दिसून येतात.
भारतात 51 टक्के लोक रात्री 11 ते 1 या वेळेत झोपतात.
भारतातील 16 टक्के नागरिकांना निद्रानाश आहे.
देशभरात 48 टक्के लोकांना झोप नीट न आल्यानं पाठदुखी होते.
80 टक्के लोकांना आठवड्यातून एक ते तीन दिवस कामावर असताना झोप येते. निद्रानाशामुळे प्रभावित झालेल्यांपैकी 10 टक्के लोकांमध्ये दीर्घकालीन, तीव्र निद्रानाश निर्माण होतो.
अमेरिकेतील जवळपास निम्म्या लोकसंख्येला तर जगभरातल्या 24 कोटी लोकांना निद्रानाशाची लक्षणं जाणवतात. एके काळी, झोप न आल्यावर झोपेच्या गोळ्या घेणं ही अतिशय घातक सवय समजली जायची. चिंताशामक औषधांच्या गटातल्या, पण झोपेसाठी वापरल्या जाणार्या औषधांच्या बाबतीतही व्यसन लागणं, हळूहळू गोळ्यांची संख्या वाढणं, जास्त प्रमाणात गोळ्या घेतल्यास श्वसनक्रिया दबणं असे त्रास आणि आत्महत्येचा धोका आढळून येऊ लागला. आजमितीला व्यसन लागणार नाही अशी काही अॅडिक्शन औषध नक्कीच मिळतात. झोप येण्यासाठी वापरल्या जाणार्या या औषधांचे सीडेटिव्हज, हिप्नोट्रिक्स, ट्रँक्विलायझर्स असे काही गट आहेत.
झोप येताना होणार्या शारीरिक क्रियेमध्ये शरीरात ‘मेलॅटोनिन’ नावाचं हार्मोन स्त्रवत असतं. त्याचा अभाव असल्यास झोप येत नाही, या विचारानं मेलॅटोनिन संप्रेरकाची अनेक औषधंही उपलब्ध आहेत. याशिवाय ‘व्हॅलेरियन’ सारखी काही वनस्पतीजन्य तसंच पर्यायी वैद्यकीय प्रणालीतील औषधंही सर्वत्र वापरली जातात.
मॅग्नेशियम
औषधं न घेता झोप यायला पाहिजे, असा काही रुग्णांचा आग्रह असतो. साहाजिकच तो योग्यही आहे. ‘मायक्रोन्युट्रिचंट’ म्हणून प्रचलित असलेले मॅग्नेशियम, कॅल्शियम ही खनिजे, तसेच ‘ड’ जीवनसत्त्व यांची आहारात कमतरता असल्यास निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. मॅग्नेशियम आणि ड जीवनसत्त्व आहारातून किंवा पूरक औषधांद्वारे घेतल्यास अनियमित झोप आणि निद्रानाशाचा विकार नियंत्रणात येतो. मॅग्नेशियम सप्लिमेंट्स वापरल्यानं शरीरातील अनैच्छिक क्रियांचं नियमन करणार्या मज्जासंस्थेतील पॅरासिम्पेथेटिक संस्था सक्रिय होते, असं 2016च्या वैद्यकीय संशोधनात आढळून आलं. दररोज 500 मिलीग्रॅम मॅग्नेशियम आठ आठवडे घेतल्यास, त्या व्यक्तीच्या शरीरातील मेलॅटोनिनचं उत्पादन नियंत्रित होतं; झोपेची वेळ आणि झोपेची गुणवत्ता सुधारते, असं 2012मधील एका संशोधनात स्पष्ट झालं आहे.
आहारातील मॅग्नेशियम
महिलांमध्ये 320 मिलिग्रॅम आणि पुरुषांसाठी 400-420 मिलिग्रॅम मॅग्नेशियमची दैनंदिन गरज असते. आपल्या नेहमीच्या आहारातील काही पदार्थांत असलेलं मॅग्नेशियमचं प्रमाण.
भोपळ्याच्या बिया (28 ग्रॅममध्ये 156 मिग्रॅ)
सरबतासाठी वापरला जाणारा सब्जा (28 ग्रॅममध्ये 111 मिग्रॅ)
भाजलेले बदाम (28 ग्रॅममध्ये 80 मिग्रॅ)
पालकाची शिजवलेली भाजी (50 ग्रॅममध्ये 78 मिग्रॅ)
भाजलेले काजू (28 ग्रॅममध्ये 74 मिग्रॅ)
भाजलेले शेंगदाणे (25 ग्रॅममध्ये 63 मिग्रॅ)
सोयामिल्क (100 मिलीलिटरमध्ये 61 मिग्रॅ)
‘ड’ जीवनसत्त्व
झोपेचं नियमन करण्यास ड जीवनसत्त्व उपयुक्त असतं, असं अनेक संशोधनात सिद्ध झालं आहे. ड जीवनसत्त्वाच्या अभावामुळे झोपेचे विकार उद्भवतात. झोप अनियमित आणि अपुरी राहते. झोपेचं नियमन करणार्या मेंदूच्या भागात जीवनसत्त्वाच्या संबंधातले संदेश ग्रहण करणारे मज्जातंतू असतात. मेलॅटोनिनच्या निर्मितीमध्ये जीवनसत्त्वाचा सहभाग असतो. (2019)
शरीरात ड जीवनसत्त्व योग्य प्रमाणात असेल, तर रात्री ठरावीक वेळेस झोप येते आणि ती होऊन सकाळी ठराविक वेळी जाग येते. (2020)
ड जीवनसत्वाच्या औषधांनी झोपेची गुणवत्ता सुधारते. (2022)
दैनंदिन गरज 19 वर्षांवरील स्त्री-पुरुषांमध्ये 600 इंटरनॅशनल युनिट्स (15 मायक्रोग्रॅम), तर 70 वर्षावरील ज्येष्ठांत 800 इंटरनॅशनल ( 20 मायक्रोग्रॅम) इतकी असत. याचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश.
ड जीवनसत्त्वाचा आहार
आहाराचा विचार करता, खालील अन्नपदार्थांमध्ये ड जीवनसत्त्व असतं. कॉड लिव्हर ऑइल, फॅटी फिश, उदा. ट्राउट, सॅल्मन, ट्यूना आणि मॅकेरल, दूध, दुधाचे पदार्थ, सीताफळ, संत्र्याचा रस.
कॅल्शियम
ट्रिप्टोफॅन या अमिनो अॅसिडचं रुपांतर सेरोटोनिनमध्ये करण्यास शरीरातील कॅल्शियम मदत करत. त्यानंतर मेंदूमध्ये या सेरोटोनिनचं रूपांतर मेलॅटोनिनमध्ये होत. कॅल्शियम कमी असलेल्या व्यक्तींमध्ये झोप कमी असते, तर आहारातून किंवा सप्लिमेंटद्वारा जास्त कॅल्शियम घेतल्यावर झोपेत सुधारणा होते.
आहारातील कॅल्शियम
दूध, कमी स्निग्धांश असलेल दही, चीज, सॅल्मन मासे, केल भाजी, ब्रोकोली. रजोनिवृत्ती झालेल्या महिलांमध्ये 1200 मिलीग्रॅमइतकी कॅल्शियमची दैनंदिन गरज असते.