अ‍ॅलर्जीचा बागुलबुवा -वैद्य क्षितिजा कुलकर्णी

HomeBlogआरोग्य / Aarogyaअ‍ॅलर्जीचा बागुलबुवा -वैद्य क्...

अ‍ॅलर्जीचा बागुलबुवा

वैद्य क्षितिजा कुलकर्णी,पुणे


       अ‍ॅलर्जी म्हणजे एखादी गोष्ट शरीराला न मानवणे, शरीराने न स्वीकारणे. यामध्ये शंभरपैकी ९९ लोकांना त्रास होत नसलेल्या गोष्टीचा एखाद्यालाच विलक्षण त्रास होतो. अ‍ॅलर्जी या विकारात व्याधीक्षमत्व वाढणे आवश्यक असते.

अन्नपदार्थातून :

  व्यवहारात मुख्यतः अन्नपदार्थ, दूध, निसर्गातील परागकण, काँग्रेस गवत, वातावरणातील धूळ, धूर, उग्रवासाचे पदार्थ , पेट्रोल, डिझेल, निरनिराळी तेले, विविध औषधे, रबर, प्लास्टिक, कृत्रिमदागिने, नायलॉन, टेरिलिन इत्यादी .पदार्थांची अ‍ॅलर्जी दिसून येते
अन्नपदार्थ म्हणजे टोमॅटो, आंबा, लसूण, मिरची, दही, आले, मीठ, लोणचे, मांसाहार, अंडी, बिब्बा, गुग्गुळ, सुंठ, दुर्वा, धने, एरंडेलतेल, मोहरीतेल, गंधक, रुई, जमालगोटा, तांबे, लोखंड, शिशें इ. धातू प्राण्यांमध्ये कुत्रा, मांजर, उंदीर, झुरळ, माशी, पाल,पक्षांचे पंख, विष्ठा, स्पर्श इ. मुळे अ‍ॅलर्जीची लक्षणे उद्भवताना दिसतात.

लक्षणे :

      अ‍ॅलर्जीच्या कारणानुसार लक्षणे दिसतात जसे की अंगावर पुरळ, दमा, सर्दी, अंगाला अतिशय खाज, सूज येणे, उलट्या, जुलाब, डोके जड होणे, सर्व अंगाची आग, लघवीला जळजळ अथवा प्रमाण कमी होणे इ. आयुर्वेद याचा सम्यक विचार करतो. कारणानुसार व लक्षणानुसार वात, पित्त , कफ या ३ दोषांच्या अनुषंगाने चिकित्सा दिल्यास उत्तम गुण आलेला दिसतो.

तपासणी :

      अ‍ॅलर्जीसाठी रक्ताची, त्वचेची तपासणी करण्याची सोय आज उपलब्ध आहे यामुळे अ‍ॅलर्जीचे निदान लवकर होऊ शकते. यासह अ‍ॅलर्जीग्रस्त भागाचे संपूर्ण परीक्षण, त्वचेच्या रंगातील बदल, फोड, सूज, दडसपणा इ. त्याकरिता जीभ, घसा पाहणे, श्वसन संस्थेतील बिघाड स्टेथोस्कोपच्या साहाय्याने बघणे त्यावरून कफ,धूळ, चिकटा याचा अंदाज येतो. लघवी, मलपरीक्षणामुळे वृक्क व यकृत यांचे कार्यातील संभाव्य वैगुण्य लक्षात येते. नाडी, त्वचा यांच्या परीक्षणामुळे रस-रक्त यातील विकृती समजतात. यासर्वांवरून आयुर्वेद उपचारांची दिशा निश्चित होते.

काही उपाय :

दुधाची अ‍ॅलर्जी असता लहान मुलांना दूध पचत नाही अशावेळी आयुर्वेदोक्त अष्टक्षीर दोषवर्णन केलेले आहेत ह्यामध्ये आईला व बाळाला दोघांना विशिष्ठ औषधे सांगितली आहेत. तसेच पंचकर्मापैकी बस्ती, विरेचन अभ्यंग, लेप आईला आणि बाळाच्या वयानुसार बाळाला केली जातात ह्यांनी उत्तम गुण येताना दिसतो.
प्राणी अथवा प्राण्यांच्या अन्य गोष्टींची अ‍ॅलर्जी असता विविध अगद आयुर्वेदामध्ये सांगितली आहेत जसे की दूषीविषादी अगद , चंपकादि अगद अथवा विविध औषधी धूप घरामध्ये फिरवल्यास ह्यामुळे उत्पन्न लक्षणे कमी झालेली दिसून येतात.
ऋतुजन्य बदलामुळे अथवा हवेतील पदार्थांमुळे उत्पन्न होणाऱ्या लक्षणांसाठी औषधी धूम्रपान तसेच प्राणायाम व श्वसनसंस्थेसाठी उपयुक्त रसायन पिंपळी, यष्टी, जलनेती, नाकात घालावयाची अणू तेलासारखी औषधीतेले, कृमींची औषधे वैद्याच्या सल्ल्याने घेणे फायदेशीर ठरते.
अन्नपदार्थांच्या अ‍ॅलर्जीकरिता मुख्यतः कोठाशुद्ध असणे, अन्नाचा अपाचित भाग शिल्लक न राहू देणे यासाठी २ जेवणमधील अंतर ३ ते ४ तास असणे, केळीचे शिकरण, फ्रुट सलाड, दूध व मांसाहार, दूध व गूळ, मीठ व दूध असे एकत्र खाणे टाळणे, उपवास करणे असे आहाराचे नियम पाळावेत. यासह निसर्गोपचार, योगासने ह्यांचा वापर हा व्याधीक्षमत्व टिकवणे व वाढविणे यासाठी करावा.

पथ्य :

 अ‍ॅलर्जी विकारात पथ्यापथ्य देखील महत्त्वाचे ठरते. अळणी जेवण म्हणजेच तिखट , खारट आंबट आहार वर्ज्य करावा. व्यसने टाळावीत. रात्री जागरण टाळावे. मूग, पडवळ, भोपळा, दोडके, कारले, ज्वारी, बाजरीची भाकरी, तांदूळ भाजून केलेला भात हे पदार्थ पथ्यकर आहेत. त्वचेला लावण्यासाठी साबण टाळून उटणे वापरावे. दिनचर्येत सांगितलेले नियम जसे की सूर्योदय समयी उठणे, भोजनोत्तर औषधी तांबूल सेवन, प्रत्येक ऋतूमध्ये सांगितलेले पंचकर्म करणे. अर्थातच हे सर्व म्हणजे आयुर्वेदात अ‍ॅलर्जीबद्दल काय काय सांगितले आहे ह्याबद्दल झाले. परंतु स्वतःची प्रकृती , कौटुंबिक व्याधी इतिहास ह्या गोष्टी जवळच्या वैद्याकडून तपासून घेऊन मग अ‍ॅलर्जीची चिकित्सा घेणे हे सर्वोत्तम !!!

5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest
Enter Your Mobile No.

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments