HomeBlogआरोग्य / Aarogyaऊर्जा निर्मिती करणारे जीवनसत्व...
नायसिन म्हणजे व्हिटॅमिन बी-३
नायसिन जीवनसत्वाला नियासिन असे पण म्हणतात. या रसायनाचे निकोटिनिक आम्ल आणि निकोटिनामाईड असे काही आठ प्रकार आहेत. याचा शोध ह्युगो वॉइडल यांनी १५० वर्षांपूर्वी म्हणजे १८२७ साली निकोटिनचे संशोधन करताना लावला. तथापि, कासिमीर फंक (Casimir Funk) यांनी १९१२ साली बेरीबेरी कशामुळे होतो याचा शोध ते घेत असताना त्यांना नायसिनबद्दल जास्त माहिती होत गेली. व्हिटॅमिन बी वर्गीय घटक पाण्यामध्ये विरघळतात. व्हिटॅमिन बी ३ हे रसायन देखील पाण्यात विरघळते. काही जीवनसत्वे स्थिर नसतात पण नायसिन टिकाऊ आणि स्थिर आहे. कारण प्रकाश, हवा, गरम तापमान, आर्द्रता आदी बाह्य गोष्टींचा नायसिन रसायनावर विपरीत असा परिणाम सहसा होत नाही. अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन (नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस) यांच्या संशोधनाप्रमाणे प्रौढ स्त्री-पुरुषांना प्रतिदिन १४ ते १६ मिलिग्रॅम नायसिन आवश्यक असते. फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेने २० मिलिग्रॅम नायसिन गरजेचे आहे, असे सुचवले आहे. मात्र ते कधीही ३५ मिलिग्रॅम पेक्षा जास्त घ्यायचे नाही. नाहीतर त्याचा काही अनिष्ट परिणाम होऊ शकतो.
आपल्या आहारातून ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल जाते. या रसायनापासून यकृतामध्ये (लिव्हर) काही प्रमाणात नायसिन तयार होते. त्याचप्रमाणे आपल्या खाण्यामध्ये असलेल्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये सूक्ष्म प्रमाणात नायसिन असते. त्यामुळे आपल्याला नायसिनची खूप कमतरता सहसा पडत नाही. एखाद्या व्यक्तीला नायसिनची कमतरता असेल तर पेलाग्रा नावाची व्याधी जडते. डिमेन्शिया, डायरिया आणि डरम्याटिटिसया तीन विकारांना थ्री-डी अस वैद्यकीय क्षेत्रात म्हटल जात. डिमेन्शिया मध्ये वार्धक्यामुळे स्मृतिभ्रंश होतो. त्याबरोबर अतिसार आणि त्वचाविकार जडतो. पेलाग्रा व्याधीत ही लक्षणे दिसून येतात. मात्र वेळीच निदान झाले तर आणि नायसिन हे व्हिटॅमिन योग्य प्रमाणात औषध म्हणून दिल्यास पेलाग्रा बरा होतो. लोकजागृतीमुळे आता जगभर पेलाग्रा ही व्याधी सुदैवाने दुर्मिळ झालेली आहे.