HomeBlogआरोग्य / Aarogyaआरोग्यदायी पिस्ते : डॉ. अनिल ल...
बहारदार हिरव्या रंगाच्या पिस्ता बर्फीचा किंवा पिस्ता आईस्क्रीमचा आस्वाद आवडीने घेण्याचा योग अनेकांना आलेला असतो. याचा वापर करून कुल्फी, चॉकलेट आणि बकलावा नामक मिठाई केली जाते. पिस्ते चवीलाही चांगले असतात, पण घरी पिस्ते विकत आणून त्याचे नित्यसेवन मात्र फारसे कुणी करताना दिसत नाहीत. कारण सुकामेव्यामधील हा घटक बराच महाग आहे, असं आपल्याला वाटतं, ते खरे आहे. पण पिस्ते आहाराच्या दृष्टीने पोषक आहेत. ते लक्षात घेतलं तर पिस्ते योग्य किंमतीत आहेत, असं वाटेल.
इतिहास
पिस्ता हे झाड काजूवर्गीय असून ते मूळचे अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि इराण मधील होते, पण नंतर ते पृथ्वीवरील अन्य भागात गेले. हे झाड वाळवंटी प्रदेशातील थंड आणि उष्ण तापमान असले तरी तगून राहते. कोरडे हवामान आणि काहीशी क्षारयुक्त जमीन असली की झाडाची वाढ चांगली होते. याच्या बिया म्हणजे पिस्ते. याचे बाह्यकवच टणक असले तरी आतील खाद्ययुक्त भाग मऊ असतो. त्यात बहारदार हिरव्या रंगाची झाक असते. अमेरिका, तुर्कस्तान आणि इराण येथे पिस्त्याचे उत्पादन सर्वात जास्त होते.
औषधी गोळ्यांपेक्षा पिस्ते स्वस्त
पिस्त्यामधील पोषक द्रव्यांचा विचार केला तर औषधांच्या गोळ्यांपेक्षा पिस्ते बरेच स्वस्त आहेत, असं आपल्या लक्षात येईल. कारण पिस्ते थोडेसे खाल्ले तरी ते आपल्या शरीराला हितावह ठरू शकतात. पिस्त्यांचे सेवन आपण एक पोषक पूरक खाद्यपदार्थ म्हणून करायचे असते. कवचासह पिस्त्याचे सरासरी वजन 570 मिलिग्रॅम असतं. त्यातील खाण्यासारख्या भागाचे वजन साधारण 300 मिलिग्रॅम असतं. त्यामुळे आपल्या पोटात दर्जेदार प्रथिने जातातच पण कमी प्रमाणात का होईना, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन के आणि फायबर सारखे महत्त्वाचे घटक देखील जातात.
पोषण मूल्ये
पिस्त्यांमध्ये दर्जेदार प्रथिने मोठ्या प्रमाणात, म्हणजे निदान 21 टक्के प्रथिने असतात. या प्रथिनांमध्ये अत्यावश्यक असणारी अमिनो आम्ले आहेत. सहसा शाकाहारी खाद्यपदार्थांमध्ये एवढ्या जास्त प्रमाणात प्रथिने नसतात. पिस्त्यांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. याचा उपयोग रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. विशेषतः वरचा रक्तदाब (सिस्टॉलिक) काहीसा खाली येतो. मात्र त्यासाठी बटाटा वेफर्स सारखे काही पदार्थ वर्ज्य करावे लागतात. पिस्त्यांमध्ये काही व्हिटॅमिन चांगल्या प्रमाणात आढळतात. शरीरातील चयापचय (मेटॅबॉलिझम) प्रक्रियांमध्ये व्हिटॅमिन बी-1 (थायमिन) आणि व्हिटॅमिन बी-6 (पिरिडॉक्झा-माईन) या घटकांना खूप महत्त्व आहे. पिस्त्यांमध्ये ही दोन्ही जीवनसत्वे पुरेशा प्रमाणात आहेत. ग्लुकोज पासून ऊर्जेने भारलेले रेणू घडवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. व्हिटॅमिन बी-6 रक्तातील शर्करेचे नियंत्रण करते आणि ऑक्सिजनची ने-आण करणार्या हिमोग्लोबिनची निर्मिती करणार्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते.
शंभर ग्रॅम पिस्त्यांमध्ये 27 ग्रॅम कर्बोदके आहेत. त्यात 10 ग्रॅम तंतुमय घटक पदार्थ, म्हणजे फायबर आहे. फायबर मध्ये उष्मांक किंवा कॅलरी नसतात. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. साहजिक विनाकारण जंक फूड; किंवा नि:सत्व पदार्थ खावेसे वाटत नाहीत. यामुळे वजन आटोक्यात राहते.
पिस्त्यामध्ये अनेक उपयुक्त खनिज द्रव्ये
शरीरातील अनेक प्रक्रिया पार पाडण्यासाठी काही खनिज द्रव्ये आवश्यक असतात. पिस्त्यांमध्ये अनेक खनिज द्रव्ये आहेत, पण त्यातील ताम्र (कॉपर) आणि मँगॅनीजचे प्रमाण चांगले आहे. लाल रक्तपेशींची वाढ होण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी ताम्र गरजेचे असते. जखमा लवकर बर्या होण्यासाठी आणि हाडांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून मँगॅनीज आवश्यक असते. मॅग्नेशियम शरीरातील तीनशे प्रक्रियांमध्ये भाग घेत असते. या खनिजामुळे दैनंदिन मानसिक ताण तणावाचा अनिष्ट परिणाम शरीरावर होत नाही. जेव्हा एखादी जखम होते, किंवा एखाद्या विशिष्ट बाह्यजिवाणूंचा शरीराला प्रादुर्भाव (संसर्ग) होतो, तेव्हा प्रतिकारशक्तीची यंत्रणा काही प्रतिकारक हल्ला करणार्या पेशींना सोडण्याची योजना करते. मात्र अशी योजना विनाकारण कार्यरत राहिली तर ती शरीराला हानिकारक ठरते. (याला इंफ्लमेशन म्हणतात). याला अटकाव करण्यासाठी पिस्त्यामधील मॅग्नेशियम सारखे घटक उपयुक्त असतात.
मेंदूचे आरोग्य सांभाळण्यासाठी मेदाम्ले आणि पिस्त्यातील अन्य घटक उपयोगी असतात. आपल्या शरीरात फ्री रॅडिकली वर्गीय अपायकारक रसायने सतत तयार होतात. त्यांना निष्प्रभ करणारी रसायने म्हणजे अँटिऑक्सिडंट्स म्हणजेच पिस्त्यामधील व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम. तसेच डोळ्यांचे संरक्षण करणारी फायटोस्टिरॉईल वर्गीय रसायने लुटेइन आणि झियाझानथिन ही पण पिस्त्यांमध्ये पुरेशी आहेत. आहारामध्ये असणारे तंतुमय घटक (फायबर) तीन प्रकारचे असतात. ते म्हणजे, विरघळणारे, अर्धवट विरघळणारे आणि न विरघळणारे. पिस्त्यांमध्ये हे तीन घटक योग्य प्रमाणात असतात. आहारतज्ज्ञांच्या मते प्रिबायोटीक वर्गीय फायबर पोटातील उपयुक्त जंतूंची वाढ होण्यासाठी हितावह असतात.
पिस्त्यांमधील फायबर आरोग्यवर्धक असल्याने दर्जेदार मानले जातात. प्रतिदिन 30 ते 40 ग्रॅम पिस्ते, बदाम, आक्रोड, काजू आदी सुक्यामेव्यामधील पदार्थ सेवन केल्यास हृदयाचे कार्य उत्तम चालते.
पिस्त्याचे रासायनिक पृथक्करण करण्यात आले आहे. (प्रति 100 ग्रॅम सोललेले पिस्ते) प्रथिने 20.3, कर्बोदके 27.5, शर्करा 7.7, तंतुमय पदार्थ 10.3, मेदाम्ले 45.4 (यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड), जलांश 4 टक्के.
जीवनसत्त्वे (मिलिग्रॅम मध्ये) :-
व्हिटॅमिन ए 1.2, थायमिन (व्हिटॅमिन बी 1) 0.87, रिबोफ्लाविन (व्हिटॅमिन बी 2) 0.16, नायसिन (व्हिटॅमिन बी 3) 1.3, पॅन्टोथॅनिक आम्ल (व्हिटॅमिन बी 5) 0.52, पिरिडॉक्सिन (व्हिटॅमिन बी 6) 1.7, फॉलिक आम्ल (व्हिटॅमिन बी 9) 0.05, व्हिटॅमिन सी 6, व्हिटॅमिन ई 2.3, व्हिटॅमिन के 0.01.
खनिज द्रव्ये (मिलिग्रॅम) :-
कॅल्शियम 105, मॅग्नेशियम 121, फॉस्फरस 490, आयर्न (लोह) 4, मँगॅनीज 1.2, झिंक (जस्त) 2.2, पोटॅशियम 1025, ताम्र (कॉपर) 1.3.