HomeBlogॲड. सायली गानू-दाबके / adv Say...विल विषयी थोडक्यात [ भाग ̵...
मागील भागात आपण एक्झिक्युटर, अॅडमिनिस्ट्रेटर, त्यांच्यावरील कायदेशीर जबाबदाऱ्या व त्यांचे अधिकार याची माहिती करून घेतली. ह्या भागात आपण विलने नेमता येणारे वारस व विलमधील विविध प्रकारच्या तरतुदींची माहिती करून घेऊ.
वारस (Beneficiary)
विलने (इच्छापत्राद्वारे) नेमलेल्या वारसास इंग्लिशमध्ये ‘लेगेट’ असे म्हणतात. यालाच दुसरा शब्द ‘बेनेफिशियरी’ (लाभार्थी) असा वापरला जातो. विलद्वारे कोणत्याही व्यक्तीला वारस नेमता येते. मुले, नातवंडे, पती / पत्नी, नातेवाईक, कायदेशीर वारस धरल्या जाणाऱ्या व्यक्ती, कायदेशीर वारस न धरल्या जाणाऱ्या व्यक्ती परंतु ज्यांना आपल्या मिळकतीतून लाभ व्हावा अशी इच्छापत्र लिहिणाऱ्याची इच्छा आहे अशा व्यक्ती. सज्ञान व्यक्तींबरोबरच, अज्ञान, मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्ती, समज नसलेल्या व्यक्ती अथवा एखाद्या गुन्ह्यात दोषी धरली गेलेली व्यक्ती इ. ना देखील विलमध्ये लाभार्थी नेमता येते व वारसाहक्क देता येतो. तसेच एखाद्या संस्थेला (धर्मादाय अथवा इतर), हिंदू देवता (Deity) यांना देखील इच्छापत्राने वारसा देता येतो. परंतु अशी कोणतीही व्यक्ती अथवा संस्था हे इच्छापत्र करणाऱ्याच्या मृत्यूच्यावेळी अस्तित्वात असणे आवश्यक आहे. इच्छापत्रात नेमलेले वारस इच्छापत्र करताना हयात असतील परंतु विल करणाऱ्याच्या मृत्यूच्यावेळी मयत असतील तर त्यांच्या नावे मृत्युपत्रात लिहिलेली मिळकत ही मृत्युपत्र करणाऱ्याच्या मिळकतीचा भाग राहते. एखाद्या मिळकतीसाठी दोन किंवा जास्ती जणांना संयुक्तपणे वारस नेमल्यास, त्यातील एकाचा मृत्यू झाल्यावर अशी मिळकत पूर्णपणे उर्वरित वारसांमध्ये विभागून मिळते.
व्यवस्थापक (Executor)
इच्छापत्राने व्यवस्थापक (एक्झिक्युटर) म्हणून नेमलेल्या व्यक्तीला वारसदेखील नेमता येते. परंतु त्याला एक्झिक्युटर म्हणून मिळावयाची मिळकतही त्याने एक्झिक्युटर म्हणून जबाबदारी स्वीकारली तरच मिळू शकते.
विलने नेमलेल्या वारसाची, असा वारस म्हणून नेमले जाण्यासाठी संमती विल करताना गरजेची नसते.
विलद्वारे विल करणारा सामान्यतः त्याच्या मालकीच्या सर्व मिळकती वारसाहक्काने देऊ शकतो. त्यामुळे सर्वप्रकारच्या स्वतंत्र अथवा स्वकष्टार्जित मिळकतीचे बाबतीत विलद्वारे वारस नेमता येतात. हिंदू पुरुषाला परिवारातील संयुक्त मिळकतीमधील त्याचा अविभक्त हिस्सादेखील विलद्वारे देता येऊ शकतो.
भविष्यातील मालमत्ता
एखादी मिळकत विल करण्याच्या दिवशी अस्तित्वात नसेल किंवा अशा मिळकतीत त्यादिवशी विल करणाऱ्याला विलने देता येण्याजोगे अधिकार / हक्क नसतील तरीही अशा भविष्यात अस्तित्वात येऊ शकणाऱ्या मालमत्तेच्या बाबतीत विलमध्ये तरतूद करून ठेवता येऊ शकते.
परंतु एखादी मिळकत कायद्याचे तरतुदीमुळे अहस्तांतरणीय असेल तर अशी मिळकत विलद्वारे वारसांना देता येऊ शकत नाही. याखेरीज प्रत्येक धर्मांचे कायद्यानुसार विलद्वारे देता येण्याजोग्या मिळकतीच्या बाबतीत काही विशिष्ट नियम व निर्बंध आहेत.
कायद्याने अवैध किंवा अमान्य धरल्या जाणाऱ्या काही तरतुदी पुढील प्रमाणे :
- वारसाहक्क मिळवण्यासाठी एखादी अशक्य अशी अट घातली असल्यास विलमधील ती देणगी अवैध धरली जाते.
उदा. विलमधील वारसाहक्क मिळण्यासाठी ‘अ’ याने माझ्या ‘ब’ ह्या मुलीशी लग्न करावे अशी तरतूद इच्छापत्रात करते वेळी ‘ब’ ही मृत असेल तर अशी अट पूर्ण करणे ‘अ’ ला शक्य नाही. तरी अशी अट व पर्यायाने अशी देणगी अवैध धरली जाईल.
2. वारसाहक्क मिळण्यासाठी अवैध किंवा अनैतिक कृती करण्याची अट घातली असल्यास विलमधील ती देणगी अवैध धरली जाते.
उदा. विलमधील वारसाहक्क मिळण्यासाठी माझ्या मुलाने त्याचे पत्नीस घटस्फोट द्यावा तरच त्याला मिळकत मिळेल अशी अट व पर्यायाने अशी देणगी अवैध धरली जाईल.
3. विल करतेवेळी एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे नाव न देता वर्णन केले असल्यास व विलचे अंमलबजावणीचे वेळी त्या वर्णनाची व्यक्ती अस्तित्वात नसल्यास अशा देणगीची अंमलबजावणी होत नाही.
उदा. माझे मोठ्या मुलाचे मुलास माझी ‘क्ष’ ही मिळकत द्यावी असे विलमध्ये लिहिले असल्यास व विलच्या अंमलबजावणीवेळी मयताचे मोठया मुलास मूलच नसल्यास अशा देणगीची अंमलबजावणी करता येणार नाही.
4. विलमधील अपूर्ण वर्णनामुळे एखादी मिळकत किंवा वारस हे निश्चितपणे सिद्ध करता येऊ शकत नसतील. तर अशा देणगीची अंमलबजावणी अनिश्चिततेमुळे होत नाही. कुठल्याही इच्छापत्रात मिळकतीचे वर्णन हे मिळकत निश्चितपणे ओळखता यावी अशाप्रकारे असणे गरजेचे असते. मिळकत सुनिश्चित करता येत असेल तर मिळकतीचे वर्णनातील किरकोळ चुकांकडे किंवा विसंगतीकडे कोर्ट सहसा दुर्लक्ष करते.
उदा. एखाद्या व्यक्तीच्या मालकीची एकच सदनिका असेल तर त्याने इच्छापत्रात माझी सदनिका लिहिले तरी पुरेसे आहे. अशा वर्णनावरून विल करणारा कोणत्या मिळकतीविषयी बोलत आहे / लिहीत आहे हे स्पष्ट कळते. एखाद्या व्यक्तीच्या मालकीचे पुणे व मुंबई शहरांमध्ये एक एक सदनिका असल्यास, इच्छापत्रात माझे मालकीची पुण्यातील सदनिका असे वर्णन मिळकत निश्चित करण्यासाठी / कुठल्या सदनिकेबाबत तरतूद केली आहे हे निश्चित करण्यासाठी पुरेशी स्पष्ट आहे असे धरले जाऊ शकते. परंतु एकाच शहरात दोन किंवा त्यापेक्षा जास्ती सदनिका असल्यास ‘माझे मालकीची पुण्यातील सदनिका’ हे वर्णन मिळकत निश्चित करण्यासाठी अपुरे ठरेल. अशावेळी इमारतीचे नाव, शहरातील भाग इत्यादी सांगणे गरजेचे ठरते. टपाल मिळण्यासाठी लिहितो तो पत्ता देखील मिळकत ओळखण्यासाठी पुरेसा धरला जाऊ शकतो.
शक्यतो कोर्ट असलेल्या वर्णनाच्या आधारे मिळकत ओळखता यावी अशाच प्रकारे विचार करते. दरवेळी कायदेशीर कागदपत्रात लिहिले जाणारे वर्णन लिहिण्याची गरज नाही.
स्थावर अथवा जंगम मिळकतीबाबत विलद्वारे देण्याच्या लाभाचे स्वरूप निश्चित करता येणे गरजेचे असते. त्यामुळे माझे मृत्यूनंतर ‘अ’ यास माझी आठवण म्हणून काहीतरी देण्यात यावे असे लिहिल्यास यातून ‘अ’ यास काय द्यायचे हेच कळत नसल्याने / निश्चित करता / येत नसल्याने सदरची देणगी ‘अ’ ला देता येणार नाही. तसेच एखाद्याने इच्छापत्रात ‘अ’ याला माझे पैसे द्यावे असे लिहिल्यास अशी देणगी अपूर्ण समजली जाऊ शकते. कारण यातून सर्व पैसे अथवा किती पैसे हे स्पष्ट होत नाही. परंतु अश्यावेळी द्यावयाच्या पैश्याचा आकडा लिहिणे गरजेचे नाही. माझे मृत्यूसमयी माझे अकौंटमध्ये असलेल्या रकमेपैकी अर्धी रक्कम ‘अ’ ह्यास द्यावी असे वर्णनदेखील पुरेसे धरले जाऊ शकेल.
विलमधील वर्णनामुळे कुठला वारस लाभार्थी होईल हे निश्चित करता येत नसेल तरी अशा देणगीची अंमलबजावणी करता येत नाही. उदा. माझे पश्चात माझे मुलास माझी मिळकत मिळावी अशी तरतूद विलमध्ये असताना व प्रत्यक्षात विल करणाऱ्यास विल करते वेळी वा अंमलबजावणीचे वेळी दोन मुलगे असल्यास कुठल्या मुलास मिळकत मिळावी हे विलमधील तरतुदीप्रमाणे निश्चित करता येत नाही. त्यामुळे अशा तरतुदीची अंमलबजावणी करता येत नाही.
शक्यतो विलमध्ये करावयाच्या तरतुदी या सोप्या भाषेत, समजण्यास सोप्या, अर्थ लागण्यास सोप्या, तुमची इच्छा ज्यातून स्पष्ट होते अशाप्रकारे लिहिलेल्या व अंमलबजावणीस देखील सोप्या असाव्यात.
ही झाली विलने नेमता येणारे वारस व विलमध्ये करावयाच्या तरतुदींबद्दल थोडक्यात माहिती. परंतु यात नमूद केल्याखेरीज इतरही काही विशिष्ट कायदेशीर निर्बंध व तरतुदी असल्याने तुम्हाला ज्या मिळकतींच्या बाबतीत विलमध्ये तरतूद करायची आहे अथवा ज्या व्यक्तींना वारस नेमायचे आहे त्याबाबतीतील नियम जाणून घेऊन कायदेशीर सल्ल्यानुसारच विल करावे.