विकसित भारताच्या स्वप्नांच्या पेरणीवर आरूढ झालेला, युवकांची क्रयशक्ती वाढविणारा व त्यांच्या हातात पैसा खेळेल असा अचंबित करणारा सलग ८ वा अर्थसंकल्प मा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. मध्यमवर्ग व नोकरदार वर्गावर करसवलतींचा वर्षाव करून ‘खुशाल खर्च करा किंवा स्वतःच्या भविष्याचा विचार स्वतः करा’ असा काहीसा मुक्त संदेश देणाऱ्या अर्थसंकल्पाने खरे पाहता कर सवलतीमध्ये गुंतवणुकीबाबतीत कोणतीही अट घातलेली नाही. त्यामुळे कर वाचविण्यासाठी आयकर करदराच्या जुन्या पद्धतीप्रमाणे गुंतवणूक करणे आवश्यक नाही. परिणामी शासन आपल्या आर्थिकतेचा विचार करेल ही गोष्ट विसरून स्वतःच्या भविष्याचा विचार स्वतः करणे योग्य. महागाईच्या तुलनेत उत्पन्न वाढलेले नाही हेही येथे अधोरेखित होते. परंतु अर्थसंकल्पान्वये ऐतिहासिक अशा कर सुधारणा झाल्या आहेत हेही मान्य करावे लागेल.