स्व.जी.डी.शर्मा : एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व

HomeBlogसंपादकीय / Sampadkiyस्व.जी.डी.शर्मा : एक ऋषितुल्य ...

व्यापारी मित्रचे जनक, संस्थापक आदरणीय

स्व. जी. डी. शर्मा


स्व. गोपीलालजी देवकरणजी शर्मा म्हणजेच ॲडव्होकेट जी. डी. शर्मा  हे एक अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व. पांढरे शुभ्र धोतर, नेहरू शर्ट, जाकीट आणि पांढरी गांधी टोपी असा नित्य पेहराव असणाऱ्या जी. डी. शर्मा ऊर्फ भाऊसाहेब यांच्या चेहऱ्यावर कायम दिलखुलास हास्य असायचे. कर, कायदे या अतिशय रुक्ष विषयात सात दशकाहून अधिक काळ स्वतःला अक्षरशः झोकून देऊन काम करणाऱ्या जी. डी. शर्मा यांचे व्यक्तिमत्व अतिशय लोभस होते. त्यांच्याकडे बघितले की आपण एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाकडे पहात आहोत असा भास व्हायचा.
भाऊसाहेबांचा जन्म २० ऑक्टोबर १९२२ चा. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील चांदारूण हे त्यांचे जन्मगाव. लहानपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धीच्या भाऊसाहेबांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यांचे वडील स्व. श्री. देवकरणजी शर्मा व्यवसायानिमित्त कोल्हापूर येथे वास्तव्यास होते. त्यामुळे जी. डी. शर्मा पुढील कॉलेज शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. त्यानंतर विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात ते स्थायिक झाले. पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज मधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. काही काळातच पुणे तसेच महाराष्ट्रातील व्यापारी वर्गात वकीलसाहेब म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
अॅड. जी. डी. शर्मा हे प्रॅक्टिस करत असताना त्यांना असे जाणवले की व्यापारी वर्गातील जवळपास ९५% व्यापाऱ्यांनी कामचलाऊ शिक्षण घेतलेले होते. अशा परिस्थितीत फारच थोड्या व्यापाऱ्यांना त्यांच्याशी संबंधित असलेल्या कायद्याची माहिती होती. अज्ञानामुळे पुष्कळ व्यापारी अजाणतेपणे नकळत कायद्याचे उल्लंघन करताना आढळत होते.
कायद्याबाबतचे अज्ञान ही योग्य सबब नव्हे. या गोष्टीची जाणीव ठेवून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या शर्माजी या एका अमराठी असणाऱ्या अस्सल मराठी माणसाने फेब्रुवारी १९५० मध्ये अर्थ, कर-कायदा या विषयाला वाहिलेले मराठी मासिक व्यापारी मित्र सुरु केले.
गेली ७४ वर्षे हे मासिक महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, तालुके आणि गावखेड्यापर्यंतच्या उद्योजक, कारखानदार, व्यापारी, व्यावसायिक, कर सल्लागार, सीए, विमा सल्लागार, सहकारी संस्था, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सहकारी बँकामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. आज पंचवीस हजार समाधानी ग्राहक महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यात आहेत. शर्माजी हे ‘व्यापारी मित्र’ चे संस्थापक संपादक. ७१ वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी मासिकाच्या संपादकपदाची जबाबदारी लीलया सांभाळली होती. कर-कायदे आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रात महाराष्ट्रात ७४ वर्षे दरमहा सातत्याने प्रसिध्द होणारे इतर दुसरे कोणतेही मासिक नाही. तसेच ७१ वर्षे या मासिकाचे संपादकपद सांभाळणारी व्यक्ती महाराष्ट्रात तरी पाहण्यात नाही.
कर-कायद्याप्रमाणेच त्यांना शिक्षण, सामाजिक काम, आध्यात्म या विषयात खूप रस होता. व्यापाऱ्यांनी व्यवसाय करताना सचोटी, प्रामाणिकपणा, विश्वास आणि नैतिकतेला प्राधान्य द्यायला हवे यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तसेच गावांत त्यांनी ज्ञानसत्राचे आयोजन केले. ज्ञानसन्नात विविध कर-कायद्यांविषयीची सविस्तर माहिती ते व्यापारीवर्गाला देत असत. तसेच मान्यवर कायदे सल्लागार, सीए यांची भाषणे या ज्ञानसनात व्हायची. ज्ञानसनात भाऊसाहेब व्यापाऱ्यांच्या काळजाला हात घालणारे भाषण करायचे यामुळे उपस्थित व्यापारीवर्ग त्यांच्या अक्षरशः प्रेमातच पडायचा. गेल्या ७४ वर्षात व्यापारी मित्र ने जवळपास ९४ ज्ञानसत्रे आयोजित केली. या ज्ञानसत्रांना व्यापारी वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळत असतो.
शर्माजी हे उत्तम संघटक होते. ते ज्या श्री खाण्डल विप्र समाजाचे घटक होते त्या अखिल भारतवर्षीय श्री खाण्डल विप्र महासभेचेवयाच्या ३८ व्या वर्षी अध्यक्ष झाले. या कामासाठी त्यांनी देशभर फिरुन एक मोठे संघटन उभारले. समाजातील गरीब, निराधार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शिक्षणफंड ट्रस्टची स्थापना केली. वर्ष १९९२ मध्ये ते या ट्रस्टचे पुन्हा अध्यक्ष झाले. यावेळेस त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन ट्रस्टसाठी मोठा निधी उभारला आणि त्याच्या माध्यमातून खाण्डल विप्र समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. या ट्रस्टच्या माध्यमातून आज देशभरात मोठे काम उभे राहिले आहे. याचे श्रेय भाऊसाहेब शर्मा यांच्या द्रष्टेपणास दिले जाते.
दि. २ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी जी. डी. शर्मा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे वृद्धापकाळाने निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत देशातील आर्थिक, राजकीय घडामोडींचा ते वेध घेत होते. व्यापारी मित्र मासिकातून आपल्या वाचकांना नवीन काय देता येईल याचा ते कायम विचार करायचे. अशा या मराठी प्रेमी संपादकाने आज महाराष्ट्रातील लाखो व्यापाऱ्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना मानाचा मुजरा !
७४ वर्षे हे मासिक आपले काम चोखपणे करीत आहे. याची उज्ज्वल परंपरा आता त्यांचे सहकारी श्री. सोहनलालजी, सुपुत्र पुरुषोत्तमजी आणि नातू अमेय हे तितक्याच समर्थपणे सांभाळत आहेत.
Tags: No tags
4.5 2 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
Enter Your Mobile No.

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments