HomeBlogविविध विषय / VIVIDH VISHAYप्रकाशझोत : लेखक : श्री. जयंत ...
पतधोरण म्हणजे काय व त्याचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित गोष्टींशी म्हणजेच कर्जव्यवहार, व्याजदर, बँकिंग व्यवहार व इतर महत्त्वपूर्ण विषयाशी त्याचा संबंध कसा येतो हे सर्वसामान्यांना फारस माहीत नसतं. हे शब्द त्याला टी.व्ही. डिबेटस, वर्तमानपत्रे यातून भेटत असतात; पण त्यांचा आपल्या जीवनाशी कसा संबंध येतो हा प्रश्न त्याला पडतो. मात्र त्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळत नाही. अर्थव्यवस्थेचं चक्र कसं फिरतं याचे ही त्याला गूढ वाटत राहते.
सर्वसामान्यांची ही उत्कंठा पूर्ण करण्यासाठी श्री. जयंत मराठे यांनी “प्रकाशझोत” हे पुस्तक लिहिले. ते या विषयाचे जाणकार आहेत. त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत पतधोरण व त्याचा अर्थ व्यवहारांवर होणारा परिणाम यावर या ग्रंथाद्वारे अक्षरश: प्रकाशाचा प्रखर झोत टाकलेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची 2017 ते 2022 या कालावधीतील दिशा व दशा यांचे विवेचन या पुस्तकात केलेले आहे.
पुस्तकात एकंदर 29 प्रकरणे आहेत. यातून पतधोरणांचे वेगवेगळे प्रकार विशद केलेले आहेत. जैसे थे पतधोरण, सावध पतधोरण, बहुनिर्णायक जैसे थे पत धोरण, गतिमान पतधोरण, परिस्थितीयोग्य पतधोरण, विकासभिमुख पतधोरण इत्यादी पतधोरणांचा तौलनिक तसेच कालानुक्रमानुसार तपशील दिलेला आहे.
पुस्तकात कोरोना आपत्तीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम अत्यंत विस्तारपूर्वक विशद केलेला आहे. एकूणच हे पुस्तक भारतीय अर्थव्यवस्थेचा समकालीन इतिहास वाचकांसमोर मांडते. अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा दस्तावेज म्हणून या पुस्तकाकडे पाहणे यथोचित ठरेल. 2017 ते 2022 या काळातील विविध अर्थप्रवाह व नवे अर्थविचार यांचा ऊहापोह यात असल्याने अर्थव्यवस्थेकडे गांभीर्याने पाहणार्या प्रत्येकाने याचे वाचन केले पाहिजे.
पुस्तकातील भाषा इंग्रजी शब्दांसाठी योजलेले मराठी शब्द कोणत्याही वयाच्या वाचकाला समजतील इतके सोपे आहेत. त्यामुळे प्रत्येक अर्थ-संकल्पना स्वयंस्पष्ट होते.
व्याजदरांतील चढउतारावर (पतधोरण सन 2017 ते 2022 फेब्रुवारी पर्यंतचे विश्लेषण)
लेखक : श्री. जयंत मराठे,
90960 83952
प्रकाशिका – सौ. मनीषा एम. खैरे,
नावीन्य प्रकाशन, स.नं. 22, सुवर्णयुग
नगर, नवीन प्रेरणा शाळेमागे,
आंबेगाव पठार, पुणे 411046.
98229 39446