वैद्य क्षितिजा कुलकर्णी,पुणे
78880 51611
drkshitijak@gmail.com
प्रसंग एक :
मध्यंतरी सायंकाळी सात नंतर मोबाईलवर मेसेज यायचा की, तुम्ही वीज बील भरलेले नाही. आज वीज बील भरण्याचा अखेरचा दिवस आहे. सोबत पाठवलेल्या लिंकवरून वीज बील भरा नाहीतर तुमची वीज त्वरित कापली जाईल. अशा आशयाचा हा मेसेज वाचून वीज बील भरलेला देखील गोंधळून जायचा. रात्री वीज कापली जाऊ नये म्हणून ती व्यक्ती सदर लिंकद्वारे पैसे भरायची. मात्र काही वेळाने त्या व्यक्तीला लक्षात यायचे की हा मेसेज एमएसईबी चा नव्हता तर फेक होता. आपले पैसे एका भामट्याच्या खात्यात जमा झाले. आपली फसवणूक झाली.
प्रसंग दोन :
मोबाईलवर एक मेसेज यायचा की, तुम्हाला मोठ्या रकमेची (उदा. पन्नास लाख) लॉटरी लागली आहे. तुमच्या बँक खात्याची सविस्तर माहिती आम्हाला पाठवा. आम्ही लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा करतो. काही व्यक्ती लॉटरीच्या अमिषाने बँक खात्याची माहिती पाठवून द्यायचे. त्यानंतर ओटीपी सांगा म्हणून फोन यायचा. ओटीपी सांगितला की आपल्या खात्यातील पैसे गेले याचा साक्षात्कार त्याला व्हायचा आणि आपली फसवणूक झाली हे लक्षात यायचे.
वरील दोन प्रसंग आपण अनेकांकडून ऐकले असतील किंवा आपल्याला देखील असे मेसेज मोबाईलवर आले असतील. अशावेळी आपण काय केले हे जरा आठवून बघा. आपण या अमिषाला बळी पडलो की नाही. हा प्रश्न आपल्यालाच विचारा. एकतर आपली फसवणूक झाली असले किंवा आपण या मोहाचे बळी पडलो नसू. असो जे काही असेल. सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. आपण आपले अनेक आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन करत असतो. आपला बराचसा वेळ सोशल मिडियावर जातो त्यामुळे आपल्याला असे वाटते की आपण या मिडियासंबंधीचे तज्ज्ञ झालो आहोत. असा समज कृपया करून घेऊ नका कारण ऑनलाईन पैसे कमविण्याच्या मोहापायी दररोज अनेक जणांना हे सोशल मिडियावरील चाचे/भामटे हातोहात फसवित आहेत. या फसवणुकीमध्ये उच्चशिक्षितांची संख्या जास्त आहे. असे तपासातून लक्षात आले आहे. तेव्हा सावधान.
सध्या घरात बसून ऑनलाईन काम करा अशा देखील जाहिराती सोशल मिडियावर येत आहेत. यामध्ये मुख्यतः अमुक एका साईटचा रिव्ह्यू करा. हॉटेलचा रिव्ह्यू करा आणि लाखो रुपये कमविण्याचे अमिष दाखविले जाते. सुरुवातीला तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी काही रक्कम हे चाचे/भामटे तुम्हाला देतात देखील त्यानंतर तुम्हाला इतका मोठा आर्थिक गंडा घालतात की तुमची फसवणूक झाली आहे. हे तुम्ही कोणाला सांगू देखील शकत नाही. या सायबर गुन्हांचे काही महत्त्वाचे प्रकार आपण थोडक्यात समजून घेऊयात. 1. फिशिंग (Phishing) या प्रकारात भामटे/फसवे इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवून वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. 2. विशिंग (Vishing) या प्रकारात आवाज आणि टेलिफोनी तंत्रज्ञानाचा वापर करून डेटा उघड करून घेतला जातो. 3. हॅकिंग (Hacking) संगणक, स्मार्टफोन, टॅब्लेट यासारख्या उपकरणावर ताबा मिळविणे त्यानंतर गैरवापर करून डेटा, दस्तऐवज माहिती चोरली जाते. 4. मोबाईल फ्रॉड – मोबाईलवरून UPI चा गैरवापर केला जातो. 5. बनावट दाखले – डॉक्टर सांगून बनावट दाखले देऊन आर्थिक फसवणूक इत्यादी. 6. स्मिशिंग (Smishing) लोकांकडून पासवर्ड किंवा पिन नंबर मिळवून आर्थिक फसवणूक करणे. 7. कागदपत्रांची चोरी एखाद्याच्या वेबसाईटवरील कागदपत्रे डाऊनलोड करून त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे. 8. धमकी – फोनवर उपचारासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला सोडविण्यासाठी पैशाची मागणी करणारे धमकीचे फोन करणे. 9. डेबिट कार्ड स्किमिंग (Debit Card Skimming) या प्रकारात डेबिट कार्ड मधील महिती बनावट उपकरणाद्वारे (एटीएम, पीओअस इत्यादी) चोरून त्याचा गैरवापर करणे. 10. बनावट सोफ्टवेअर – संगणक चालू केला की असे सॉफ्टवेअर आपोआप लोड होऊन त्याद्वारे डेटा चोरणे. अशाप्रकारचे अनेक सायबर गुन्हे सध्या आपल्या आजुबाजूला घडत आहेत. त्यामुळे सावध राहून ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणे फार आवश्यक आहे. यासाठी बँका, वित्तसंस्था आणि रिझर्व्ह बँक वेळोवेळी जाहिराती द्वारे ग्राहकांना/ ठेवीदारांना/ऑनलाईन व्यवहार करणार्यांना दक्ष राहण्यासाठी सांगत असते किंवा सायबर गुन्हे टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे सांगत असते. त्याकडे आपण लक्ष देऊन ही माहिती लक्षात ठेवायला हवी किंवा त्याची नोंद/झेरॉक्स करून ठेवायला पाहिजे जेणेकरून फसवणूकीपासून आपण सावध होऊ शकू. प्रत्येकाने जागरूक राहणे यासाठी खूप आवश्यक आहे.
सोशल मिडिया वापरताना किंवा ऑनलाईन व्यवहार करताना काय काळजी घ्यायची हे आता आपण थोडक्यात समजून घेऊयात. 1. झटपट पैशाच्या मोहात न पडणे. 2. फुकट/मोफतच्या मोहापासून दूर रहा. 3. आपण फसवले गेलो असू तर घरातल्या व्यक्तींना सांगा. 4. गुंतवणूक/जमीन/फ्लॅट खरेदी विक्री करताना चौकशी करा. 5. प्रत्यक्ष न दिसणार्या व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेऊ नका. 6. सेबी नियुक्त गुंतवणूक सल्लागारांना भेटून त्यांचा सल्ला घ्या. 7. ऑनलॉईन व्यवहार करताना चूक झाली असेल तर ती त्वरित दुरुस्त करा. या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 8. फोनवर कोणतीही आर्थिक माहिती देऊ नका. 9. आपली फसवणूक झाली असे लक्षात आल्यास 1930 या नंबरवर संपर्क साधा. तसेच httsp://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. 10. आपल्या बँक खात्याचा व ईमेलचा पासवर्ड वारंवार बदलत रहा.
आपण बरेचदा खरेदीसाठी एखाद्या मॉलमध्ये जातो तेव्हा काही जणं आपल्याकडून आपली माहिती भरून घेतात. अशी माहिती देताना सावधानता बाळगा. आपल्या मोबाईल, ईमेल, शक्यतो अनोळखी व्यक्तीला देऊ नका. फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा डेटअॅपवर असणारी सगळी माहिती खरी नसते. अनेकदा त्यामधील फोटो व प्रत्यक्षातील व्यक्ती यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. अनेक मुलं/मुली फोटो व प्रोफाईल बघून एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि फसतात. तेव्हा या हातचालाखी पासून बनवाबनवी पासून शक्यतो दूर रहा.
फुकट आणि कष्ट न करता कधीच पैसा, सुख-समृद्धी प्राप्त होत नाही हे कायम लक्षात ठेवा. म्हणूनच “हाव सोडली की मोह संपतो, आणि मोह संपला की दुःख संपते” हे ध्यानात ठेवायला हवे. तसेच समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाही तसेच प्रयत्नांशिवाय यश मिळत नाही. हे एकदा आपल्याला समजले की, ऑनलाईनच्या फसव्या दुनियेपासून आपण आपल्याला दूर ठेवण्यात यशाची होऊ शकू. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात विनोदातून एक संदेश दिला आहे. बनवाबनवी करून तात्पुरते यश मिळते. मात्र ही बनवाबनवी पकडली गेली की आपले फार मोठे नुकसान होते. हे नुकसान आयुष्यात भरून काढणे शक्य नसते. म्हणूनच सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यातील ही फसवणूक टाळण्यासाठी सावध राहणे, जागरूक राहणे आणि कायम आपले कान, डोळे उघडे ठेवणे खूपच गरजेचे आहे नाहीतर या भामट्यांच्या/सायबर यांच्याच सापळ्यात आपण अलगद अडकलोच समजा. धन्यवाद.