HomeBlogएस जी शर्मा / S G Sharmaसारे जहाँसे अच्छा-एस जी शर्मा
सारे जहाँसे अच्छा
एस जी शर्मा
15 ऑगस्ट 1947 ते 15 ऑगस्ट 2023 म्हणजेच स्वातंत्र्याची 76 वर्षे भारताच्या प्रगतीची, उज्ज्वल परंपरेची, एकात्मतेची, समरसतेची, पराक्रमाची, स्वाभिमानाची, बलिदानाची आणि अभिमानाची.
स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहेच. पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे. या आद्यकर्तव्याचा गेल्या काही वर्षात आपल्याला विसर पडू लागला आहे की काय असे सध्याचे वातावरण झाले आहे. केवळ स्वतःचा विचार न करता देश प्रथम [ Nation first ] हा विचार कृतीत उतरविण्याची आज खरी आवश्यकता आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश म्हणून आपली नवी ओळख निर्माण झाली आहे. भारत ही जगातील 5 वी मोठी अर्थव्यवस्था आहे. याचबरोबर सर्वाधिक तरुणाई असणारा आपला देश आहे. या तरुणाईला विधायक अशा कामात गुंतवून ठेवणे हे आज देशापुढील मोठे आव्हान आहे. तरुणांनीही हरित ऊर्जा, नवे तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात आपले ज्ञान आणि कौशल्य अधिकाधिक विकसित करण्यासाठी प्रयत्नांची कास धरायला हवी. याच्या जोरावरच ‘आत्मनिर्भर भारताचे’ आणि ’शाश्वत विकासाचे’ स्वप्न पूर्ण होणार आहे. 75 ते 100 वर्षे हा 25 वर्षांचा भारताचा अमृतकाळ राहणार आहे. याच काळात भारताला विकसित देशांच्या पंक्तीत उभे राहिलेले बघायचे आहे. 76 व्या स्वातंत्र्यदिनी हा संकल्प आपण करूयात. यासाठी 140 कोटी मजबूत हातांची आवश्यकता आहे. संघटित प्रयत्नांतून इतिहास निर्माण होतो हे भारतीयांना सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! जय हिंद !
‘मून’ की बात
आजच्या तरुणाईला चांदोबापेक्षा “मून’’ (Moon) हा शब्द जरा जास्त जवळचा असेल म्हणून तो वापरला आहे. या चांदोबाशी जवळीक निर्माण करण्यासाठी भारताचे चांद्रयान नुकतेच दिमाखात अवकाशात झेपावले. व्यापारी मित्रचा ऑगस्ट अंक आपल्या हातात पडेल त्याच महिन्यात हे यान चांदोबाला भेटेल असे म्हणायला हरकत नाही. आजपर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या चांद्रयान मोहिमेला अपयश आले होते. तरीदेखील आपण निराश न होता परत एकदा ही मोहीम हाती घेतली आहे यासाठी या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि भारत सरकारचे कौतुक करायलाच हवे. ‘हार के बाद ही जीत है’ या गाण्यानुसार यावेळी आपली चांद्रयान मोहीम यशस्वी होवो. म्हणजे आपण ‘मून की बात’ करु शकू.
उंच भरारी
भारतीय शेअर बाजारात (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज = बीएसई) सध्या नवनवीन उच्चांक प्रस्थापित होत आहेत. बीएसईच्या निर्देशांकांने (Sensex) नुकताच 67,000 चा टप्पा ओलांडला. याचबरोबर महागाई निर्देशांक खाली येऊ लागला आहे. भारतीय रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण वेगात होत आहे. काही भागात अतिवृष्टी होत असली तरी देशभरात समाधानकारक पाऊस चालू आहे ही प्रत्येक भारतीयासाठी आनंदाची गोष्ट आहे. यामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला सुगीचे दिवस येण्याची शक्यता निर्माण होईल असा आशावाद व्यक्त करूया !
वैविध्यपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न !
व्यापारी मित्र मासिकाच्या ऑगस्ट विशेषांकात नेहमीच्या सदराबरोबरच इतरही वैविध्यपूर्ण लेख देण्यात आले आहेत. या अंकापासून सीए. गणेश पांचाळ यांची ‘स्त्रोतातून कपात’ (TDS) संबंधी लेखमाला सुरु करीत आहोत.
‘वित्तसंभ्रम: अर्थात पैश्याच्या बाबतीत घडणार्या चुकांची ओळख’ या शीर्षकान्वये प्रा. स्मिता सोवनी यांचीही लेखमाला सुरू आहे. त्याचप्रमाणे सीए. सुनील विंचू यांची आयकर कायद्यामधील चॅप्टर 6 मधील विविध कलमांची माहितीही दरमहा प्रकाशित होत आहे. आपणास लेखाबद्दल काही शंका/प्रश्न असतील तर कृपया संपादकीय विभागाकडे पत्र-ईमेल पाठवावे. विविध पैलूंवर नवनवीन विषयांसह लेख देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहेच. वाचकांसाठी उपयुक्त राहतील अशा आपल्याही बहुमूल्य सूचनांचे/ लेखांचे स्वागत!